Mudra Yojana 2025 Update Women Loan Distribution : केंद्र सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) आतापर्यंत तब्बल ५२ कोटी लोकांना तारणमुक्त कर्ज देण्यात आल असून या कर्जांची एकूण रक्कम ३३ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी ६८ टक्के लाभार्थी महिला असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली आहे. ही माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी नागपूरमध्ये दिली.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत आयोजित भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकाऱ्यांच्या ७७ व्या तुकडीच्या समारोप समारंभात बोलताना चौधरी यांनी सांगितले की, मुद्रा योजनेंतर्गत नागरिकांना ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी छोटे उद्योग, सेवा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू केले असून देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे.
गेल्या दशकभरात केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्थेवर दिसून येतो. मुद्रा योजनेची कर्जमर्यादा वाढवण्याबाबत २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केंद्र सरकारने ‘तरुण’ श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी कर्जमर्यादा १० लाख रुपयांवरून थेट २० लाख रुपये केली होती.
पंतप्रधान मुद्रा योजनेत तीन श्रेणींमध्ये कर्ज देण्यात येते – शिशू, किशोर, आणि तरुण. विशेषत: ‘तरुण’ श्रेणीतील यशस्वी कर्जपरतफेड करणाऱ्या उद्योजकांना नव्याने वाढीव कर्जमर्यादा देण्यात आली आहे. यामुळे नवउद्योजकांसाठी आणि व्यवसाय विस्तार करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही योजना एक सुवर्णसंधी आहे.
केंद्र सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे देशात उद्योजकतेच व्यापक वातावरण तयार होत असून, महिलांचा मोठा सहभाग ही या योजनेची विशेष बाब आहे.
🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.