Fact Check: मोफत पिठाची गिरणी वाटप योजना महाराष्ट्रात सुरु आहे का? जाणून घ्या सत्य
Free Flour Mill Yojana Maharashtra Online Registration : सध्या काही वेबसाइट्स आणि सोशल मीडियावर “महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोफत किंवा 90% अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार” अशा आशयाची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये महिलांना केवळ 10,000 रुपये भरून, एक लाख रुपये किमतीची पिठाची गिरणी मिळते असा दावा करण्यात आला आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय सुरू करता येतो आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात, अशा स्वरूपात ही माहिती पसरवली जात आहे. मात्र, सत्यता पडताळल्यावर ही संपूर्ण माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट होते.
महाराष्ट्र सरकारने अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा केलेली नाही. ना महाडीबीटी (mahadbt.maharashtra.gov.in) पोर्टलवर, ना समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर, ना कोणत्याही अधिकृत शासन निर्णयात अशा योजनेचा उल्लेख आहे. सरकार जर अशी योजना जाहीर करत असेल, तर ती अधिकृत माध्यमातून स्पष्ट अधिसूचना, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदतीसह प्रसिद्ध केली जाते. मात्र या प्रकरणात तस काहीही झालेल नाही.
खोट्या योजनांच्या नावावर अनेकदा नागरिकांची फसवणूक केली जाते. वैयक्तिक माहिती गोळा करणे, बनावट अर्ज घेणे किंवा नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे उकळणे अशा प्रकारचे प्रकार यामागे लपलेले असतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजेस, लिंक, यूट्यूब व्हिडिओ किंवा WhatsApp फॉरवर्ड्सकडे गंभीरपणे पाहाव आणि अधिकृत खात्रीशीर स्रोतावरूनच माहिती घ्यावी.
“मोफत पिठाची गिरणी वाटप योजना” सध्या सोशल मीडियावर फिरत असली, तरी त्यास कोणताही अधिकृत आधार नाही. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती अशा वेबसाइट्सवर देऊ नये.
सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी फक्त अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा — जसे की mahadbt.maharashtra.gov.in किंवा संबंधित विभागाचे अधिकृत पोर्टल्स. शंका असल्यास स्थानिक पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.
🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांना मोठा दिलासा – ‘बांधकाम कामगार योजने’अंतर्गत मिळतो ३२ योजनांचा लाभ.