CMEGP Scheme 2025 Maharashtra : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम’ अर्थात CMEGP योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जासोबतच अनुदान दिले जाते. ही योजना विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर आहे. 2025-26 या वर्षात या योजनेला अधिक गती देण्यात येणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून पात्र उमेदवारांना 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावर शासनाकडून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 25 टक्के पर्यंत तर राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. हे कर्ज व अनुदान उपकरणे, कच्चा माल आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी वापरता येते. ही योजना क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्वरूपात असून, बँकाकडून कर्ज मंजूर झाल्यानंतरच अनुदान मंजूर केल जात.
या योजने साठीच्या पात्रतेच्या अटी देखील सुटसुटीत असून, अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे आणि तो किमान आठवी पास असावा. उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही, मात्र अर्जदाराने पूर्वी कोणताही उद्योग सुरू केलेला नसावा आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकांशी समन्वय साधून आता कर्जमंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे. ही योजना रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागात आर्थिक उन्नती घडवून आणण्यास मोठा हातभार लावत आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाडीबीटी कृषी अनुदान लाभार्थी यादी मोबाईलवरून ऑनलाईन तपासा.