Ladka Shetkari Yojana: राज्य सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत, फडणवीसांची मोठी घोषणा
Ladka Shetkari Yojana Devendra Fadnavis Announcement: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नवी ‘लाडका शेतकरी योजना’ जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ६ हजार रुपयांची वार्षिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत जाहीर केला. केंद्र सरकारच्या PM-KISAN योजनेप्रमाणेच ही राज्यस्तरीय योजना सुरू करण्यात येणार आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देणे हा आहे.
फडणवीस म्हणाले की, “शेतीत गुंतवणूक वाढून ती फायदेशीर झाली पाहिजे, म्हणूनच केंद्रासारखेच राज्य देखील ६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देईल.”
विदर्भातील शेतकऱ्यांना जमिनीच्या ५ पट मोबदल्याची भरपाई
२००६ ते २०१३ या कालावधीत विदर्भातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या किंमतीच्या पाचपट मोबदला दिला जाणार आहे. त्या काळात थेट खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांचे हक्क गोठवण्यात आले होते, अशी गंभीर टीका फडणवीसांनी केली.
“शेतकऱ्यांसाठी जमीन ही आईसारखी असते. ती जाताना दुःख होते. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की थेट खरेदीसाठी शेतकऱ्यांना ५ पट मोबदला मिळालाच पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन शासन निर्णय लवकरच, प्रकल्पग्रस्तांना मदत
मृदू जलसंधारण विभागाच्या अंतर्गत जमिनी विकत घेण्यासाठी नवीन शासन निर्णय आठ दिवसांत जाहीर केला जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांना भांडवल देण्यात येणार असून त्यांच्या मुलांना रोजगारासाठी कर्ज दिले जाईल.
ड्रोन व उपग्रहाद्वारे जमिनीचे डिजिटायझेशन
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचे ड्रोन व सॅटेलाईटच्या मदतीने डिजिटायझेशन होणार आहे. त्यामुळे पंचनाम्यासारख्या अडचणी कमी होतील आणि जमीन मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल. तसेच, राज्यात बळीराजा जलसंजीवनी योजना, वैनगंगा-नलगंगा नदीजोड प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, आणि अन्नप्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
🔴 हेही वाचा 👉 घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; अनुदानात थेट इतक्या रुपयांची वाढ.